पुनर्उत्पादक शेती

(प्रस्तावना: औद्योगिक किंवा आधुनिक पद्धतीची शेती, रासायनिक खताचा वापर, एकेरी आणि ठराविकच पिकांचे उत्पादन, यामुळे जगभर जमिनीचा कस तर कमी होतोच आहे, पण त्याहीपेक्षा भयानक म्हणजे मातीचे रूपांतर धुळीत (मृत मातीत) होत आहे. असेच चालू राहिले तर सगळीकडे काळ्या सुपिक जमिनीची जागा पांढरी वाळवंटं घेतील. यावर सेंद्रिय शेती हा पर्याय अपुरा आहे. आता एकच मार्ग आपले भविष्य तारू शकतो, तो म्हणजे ‘नैसर्गिक तत्त्वांवर आधारित शेती’. सादर लेख-मालिकेत ‘पुनर्उत्पादक शेती’ (Regenerative Agriculture) तंत्रावर खुलासा केला आहे.)

व्यावसायिक विज्ञान आणि शेती-शास्त्र:

विज्ञानात होत असलेल्या संशोधनाने मानवी ज्ञानात सातत्याने भर पडत आहे. काल पर्यंत अटळ सत्य मानल्या जात असलेल्या माहितीत आज स्पष्ट बदल होत आहेत. नवीन काही कानावर पडले की, “ह्यॅं! काहीतरीच काय? हे शक्यच नाही!”, अशी अविचारी प्रतिक्रिया देण्यापेक्षा, “ओ हो! असेही होवू शकते का?” असे जिज्ञासू उद्गार समजूतदारपणाची निशाणी आहे.

अन्न, आरोग्य आणि औषध शास्त्रात होत असलेल्या बदलांशी आपण सर्वच अवगत आहोत. परंतु हा प्रश्न आपण कधी केला का, की, फक्त निवडक क्षेत्रांमधील वैज्ञानिक संशोधनच सर्वसामान्यांपर्यंत का पोहोचते? यामागे प्रामुख्याने दोन कारणे आपल्याला आढळतील – ‘व्यावसायिक हित’ आणि ‘राजकारणी हित’. अशा लोभाच्या उद्देशाने पछाडलेल्या विज्ञानाला "छज्ञविज्ञान" (Pseudoscience) म्हणतात.

ज्या क्षेत्रांमध्ये व्यावसायिक किंवा राजकारणी हित नाही, तिथे विज्ञानाचा जेमतेमच प्रचार आणि प्रभाव दिसून येतो. ‘शेती’ असेच एक क्षेत्र आहे. इथेही व्यावसायिक हितामुळे दोन अपवाद आपल्याला दिसतात - शेतीमध्ये वापरली जाणारी यंत्रे आणि रासायनिक खते. परंतु प्रत्यक्ष शेती करण्याच्या पद्धतीत मात्र वैज्ञानिक संशोधनाचा खूपच अभाव दिसतो.

मग तुम्ही म्हणाल, ‘Hydroponic’, ‘Aeroponic’ आणि ‘Aquaponic’ हे शेती क्षेत्रातले संशोधन नाही काय? प्रश्न बरोबर आहे; पण जरा सविस्तर विचार करूया.

निसर्गाचे मार्ग हे नेहमी शांत आणि संथ परंतु चिरस्थायी असतात. असे मार्ग व्यावसायिक समिकरणात बसत नाहीत. व्यवसाय म्हणालात की ‘कमी गुंतवणुकीत आणि कमी वेळात जास्तीत जास्त आर्थिक फायदा’ हेच धोरण अवलंबिले जाते. ‘पुडके खाद्य उद्योगा’ने (Packaged Food Industry) गेल्या दोन दशकात गगनचुंबी झेप घेतली आहे. त्याचबरोबर लठ्ठपणा, कर्करोग, मधुमेह, हृदयविकार ईत्यादी आजारही समाजातील सर्व स्तरांमध्ये पसरलेले आहेत. मागोमाग, व्यावसायिक दृष्टिकोनामुळे निर्माण झालेल्या ह्या समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी मग आरोग्य व्यवसायांची भरभराटी झाली.

आज सगळीकडे ‘सेंद्रिय’ खाद्याला (Organic Food) वाढती मागणी आहे. सेंद्रिय खाद्य ही काही हुशार व्यावसायिक मेंदूंमधून निर्माण झालेली आणि लोकांवर जबरदस्ती थोपवलेली गरज आहे. हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे की ‘सेंद्रिय म्हणजे नैसर्गिक नव्हे’! सेंद्रिय म्हणजे अ-रासायनिक – रासायनिक खताचा वापर न करता पिकवलेले अन्न. रासायनिक खतावर पिकवलेल्या किंवा प्रक्रिया केलेल्या (Processed) खाद्यापेक्षा, सेंद्रिय खाद्य नक्कीच बरे. परंतु ‘Hydroponic’, ‘Aeroponic’ व ‘Aquaponic’ या सेंद्रिय जरी असल्या तरी नैसर्गिक पद्धती तर नक्कीच नाहीत. निसर्ग जसे निरोगी अन्न आणि परिपूर्ण परिसंस्था सर्वांना पुरवतो, त्याची बरोबरी सेंद्रिय हा पर्याय कधीही करू शकणार नाही. मानव निर्मित अथवा कृत्रिम अशा कुठल्याही पद्धती निसर्गापेक्षा इष्टतम असणे हे फारच अवघड; खरे तर अशक्यच!

रासायनिक व सेंद्रिय शेती:

जमीन, पिके आणि जनावरांकडे फक्त आणि फक्त आर्थिक फायद्याच्या दृष्टिकोनातून बघणे म्हणजे औद्योगिक शेती. आधुनिक शेती ही औद्योगिक शेतीच आहे. एक परिपूर्ण परिसंस्था काय असते हे समजून घेण्याचा प्रयत्न इथे कधीही झालेला नाही.

रासायनिक खताच्या वापाराणे मातीला व सर्वांच्या आरोग्याला होणाऱ्या नुकसानाबाबत बोलण्यासारखे खरे तर आता काही उरलेले नाही – हे दुष्परिणाम सगळ्यांनाच माहिती आहेत. दुर्दैव हे, की, हा घात उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही आपल्याला स्वत:वरच आवर राहिलेला नाही. लोभाच्या आहारी गेलेले मन, त्यातून सुटका मिळवण्यासाठी साधा प्रयत्नसुद्धा करत नाही.

सेंद्रिय खाद्य हे रासायनिक खतावरच्या पिकापेक्षा नक्कीच बरे. परंतु हा मार्ग नैसर्गिक नव्हे, असे का? जंगल हे नैसर्गिक परिसंस्थेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. एका जंगलामधील झाडांना दुसऱ्या जंगलातून खतपाणी मिळताना कोणी बघितले आहे का? कुठलीही परिसंस्था ही स्वावलंबी आणि परिपूर्ण असली तरच ती दीर्घकाळ टिकू शकते. निसर्गाच्या सर्व परिसंस्था अशाच असतात – जटिल परंतु अमूर्त, संथ परंतु स्थायी. कृत्रिम अवलंबित्व अस्थायी तर असणारच; कुठे ना कुठे ते असंतुलनही निर्माण करणार. सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय प्रथिने वापरणे चुकीचे नाही. ते तुमच्या स्वतःच्या शेतातल्या प्राण्यांपासून व पिकांपासून न येता जर कोणाकडून विकत आणावे लागत असेल तर ते नैसर्गिक संतुलन बिघडवणारे आहे. जिथे व्यापार असणार, तिथे आर्थिक मोह नैतिक मूल्यांवर कधीतरी पाणी सोडणारच!

एक नवीन युग – पुनर्उत्पादक शेती:

बऱ्याच निसर्ग अभ्यासकांनी गेले कित्येक वर्षे जमीन, माती, झाडे, पिके, कीटक, पक्षी आणि जनावरे यांच्या परिसंस्थेचा आणि स्वतः अनुकरून मिळवलेल्या अनुभवाचा भरपूर प्रसार केला आहे. कितीतरी अमूल्य पुस्तके या परतीच्या आणि शाश्वतीच्या विचारांवर लिहिली गेली आहेत.

पुस्तके

  • अॅलेन सेव्हरी/जोडी बटरफिल्ड: Holistic Management
  • चार्ल्स मेसी: Call of the Reed Warbler
  • गेब ब्राऊन: Dirt to Soil
  • एरिक टोन्समेयर: Perennial Vegetables
  • डेव्हिड मोन्टगोमेरी १. Dirt: The Erosion of Civilizations २. Growing a Revolution ३. The hidden half of the Nature
  • पॉल होकेन: Regeneration
  • म. सां. स्वामीनाथन: In search of Biohappiness
  • जॉन केंप्फ्: Quality Agriculture
  • निकोल मास्टर्स: For the Love of Soil
  • जोएल सॅलतीन: Fields of Farmers
  • डेल स्ट्रिकलर: १. The complete guide to Restoring your Soil २. The Drought Farm ३. Managing Pasture
  • मार्क शेफर्ड: Restoration Agriculture

आधुनिक शेतीने तर नुकसान होतच आहे परंतु पारंपारिक शेतीसुद्धा शेकडो वर्षे ‘अनैसर्गिक’ पद्धतीने करत आल्याने मानवाने या पृथ्वीवर जो नायनाट केला आहे तो या पुस्तकांद्वारे आपल्याला शिकायला मिळतो. निसर्गाचे मार्ग कसे असतात आणि जगभर विविध ठिकाणी हे मार्ग आपल्या काही पूर्वजांना कसे आत्मसात होते, याचे स्पष्ट पुरावेही इथे मिळतात. माती हा एक जीव आहे आणि त्यातला जिवंतपणा टिकविण्यासाठी झाडे, पिके, कीटक, पक्षी आणि जनावरे हे एकत्र येवून एक परिपूर्ण पर्यावरण परिसंस्था कशी निर्माण करतात याचाही सुंदर खुलासा या विद्वानांनी केला आहे.

शेती – एक परिपूर्ण नैसर्गिक परिसंस्था

आधुनिक शेती जमिनीला एक यंत्र मात्र बघते; मातीच्या जिवाचक्राचे कार्य कसे चालते, हे समजून न घेता, फक्त उत्पादन घेत राहण्याचा कल दाखवते. ह्या एकतर्फी आणि स्वार्थी वृत्तीने आपण जमिनीतला जीव तर नष्ट करतोच आहोत, परंतु निसर्गापासून दूर जाऊन आपण स्वतःचाच घात घेण्याचे काम करत आहोत.

पुनर्उत्पादक शेती हा निसर्गाच्या अभ्यासातून आणि आपण आजपर्यंत शेतीक्षेत्रात केलेल्या चुकांपासून शिकलेला एक प्रामाणिक धडा आहे. हे वैज्ञानिक संशोधन किंवा नवीन प्राप्त झालेले ज्ञान नसून, मानवाने दुर्लक्षिलेला आणि विसरलेला असा निसर्गाचा एक दूरगामी मार्ग आहे.

पुनर्उत्पादक शेतीपद्धतीची पाच तत्त्वे आहेत: १. जमीन आच्छादित ठेवणे २. जमीन कमीत कमी विस्कळीत करणे - न नांगरणे ३. जास्तीत जास्त पिकांची विविधता राखणे ४. वर्षभर जमिनीत जीवंत मुळे टिकविणे - जमीन कधीही उघडी न ठेवणे आणि ५. जनावरांना समाकलीत करणे

आज जगभरात हजारो शेतकरी या मार्गावर चालून शेतीला निसर्गाच्या छत्रछायेत आणण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. शेतकरी हाच या जगाचा खरा तारक आहे. आजही अर्ध्यापेक्षा जास्त भारतीयांसाठी शेती हेच उपजीविकेचे प्राथमिक साधन आहे. शेतकरी कुटुंबीयांनी दुसऱ्या व्यवसायाकडे बघण्याऐवजी इतर सर्वांनीच शेतीकडे वळावे अशी निर्णायक वेळ आलेली आहे. हा प्रश्न निव्वळ आरोग्याचा न राहता, सर्व प्राणिजातीच्या पलीकडे जाऊन तो आता ह्या पृथ्वीच्या अस्तित्त्वावर उठलेला आहे. या काळात आपण मागे राहून चालणार नाही. मित्रांनो, डोळे उघडा, सज्ज व्हा आणि भारताला पुन्हा एकदा आघाडीवर घेऊन चला!

(या लेख-मालिकेच्या पुढील भागात आपण पुनर्उत्पादक शेतीच्या पाचही तत्त्वांना जवळून समजून घेवूया.)